Friday, September 18, 2020



साथी पृथ्वीराज तौर ने मेरी तीन कविताओं का मराठी अनुवाद किया है, जिन्हें मराठी पाठकों से अच्छा प्रतिसाद भी मिला है ! साथी पृथ्वीराज का आभार !

.

१.

दुस-यांदा काहीच घडत नसतं

प्रत्येक गोष्ट एकटी असते, प्रत्येक स्वप्नसुद्धा

दुस-यांदा तसंच प्रेम होऊ शकत नसतं

जूनं प्रेम परतलंच तरी ते ते राहिलेलं नसतं

तेच चुंबन तसंच पुन्हा नाही घेतलं जाऊ शकत

आपण जेव्हा पोहचतो पुन्हा  फिरून जुन्याच जागी

ती तीच राहिलेली नसते

प्रत्येकवेळी निरोपाचे क्षण नव्याने एकाकी असतात

प्रत्येक वेळी दूर जाण्याची जुनीच पद्धत नसते.

प्रत्येक घोषणा नव्या कंठातून नवी होऊन दुमदुमते ज्या आकाशात

ते आकाश असत नाही जुन्या दिवसातलं

आणि जी क्रांती जुन्या क्रांतीपासून शिकून पावलं टाकते जमिनीवर

ती जमीन नवी असते तिला नवा आकार देणारी.

आपण जो देशकाळ जगतो तो दुस-याच क्षणी इतिहास होतो

एखाद्या स्वप्नामागे सतत धावत रहाणे हेच तर आयुष्य आहे

जिथे धडधडणारा थरथरता अविराम आहे.

२.

स्वयंपाकघरातील भांड्यात, डब्ब्यात आणि बाटल्यात शोधाशोध करताना

तिला स्वत:लाही हे नसतं ठाऊक कि तिला का वाटतं

जणू ती एखादं षडयंत्र करत आहे

भिंतींच्या विरोधात

किंवा सुखासुखी व्यतीत होणा-या जगण्याच्या विरोधात.

तिला नाही ठाऊक कि भल्या पहाटे का आठवलं

वीस वर्ष जुनं तिचं प्रेम

ती आता पुन्हा एकदा विचार करू लागलीय त्याच्याविषयी

जे लपवून ठेवण्यात ती आजवर यशस्वी झाली.

तिला अजूनही वाटतं कि कराव्यात

अर्ध्या रात्री चंद्राशी थोड्या गप्पाटप्पा

आणि तिचा नवरा अंथरुणात तिची वाट बघत असतो

लवकर लवकर सेक्स आटोपून झोपण्यासाठी

कारण उद्या सकाळी त्याला लवकर उठायाचं आहे

आणि खूप महत्वाची कामे आटपायची आहेत

कार्यालयात  पोहोचण्यापूर्वी.

खरेतर ती स्वत: पासूनही लपवत रहाते

तिच्या  भयंकर विचारांना

वेड्या योजनांना

अशक्य  इच्छांना

आणि पहाटे पडलेल्या स्वप्नांना.

जेव्हा ती अगदी निवांत आणि निश्चिंत दिसत असते

तिच्या आत सगळ्या भयावह योजना

एकमेकींना नवे रस्ते सांगत असतात.

जेव्हा ती एकदम पाळीव वाटते

तेव्हा ती एक मोटारबोट घेऊन

समुद्रात खूप दूर निघून जाण्याबद्दल

ठाम विचाराव आलेली असते.

घर सजवताना मांडामांड करतांना

ती घराला डायनामाईट लावून उडवून देण्याबद्दल ठरवत असते.

मुलांविषयी ती नेहमी विचार करते कि

उडण्याची योग्य वेळ येताच ती त्यांना ढकलून देईल

जसे पक्षी आपल्या पिल्लांसोबत वागतात.

आता अलीकडे जेव्हा ती वाचू लागली आहे

एका वाचनालयात बसू लागली आहे

एका फिल्म क्लबची सदस्य झाली आहे

थिएटर करण्याचे आखाडे बांधू लागली आहे पुन्हा एकदा.

जाऊ लागली आहे मोर्च्यात आंदोलनात

आणि घराबाहेर आपलं जग विस्तारू लागली आहे

खूपच त-हेत-हेचे विचार येऊ लागले आहेत

आणि घटनाही अजब घडू लागल्या आहेत.

खरंतर हे अपवाद आहेत

पण अपवादसुद्धा जर वेळेवर

मृत्यूची शिकार झाले नाहीत तर काही काळाने

बदलून जातात आणि सहजप्रवृत्ती होतात.

कधी कधी अर्ध्या रात्री उठून

ती आठवू लागते

हा जो जाड, गबदुल्ला, ढेरपोट्या

अंथरुणावर पसरला आहे

हा जो नाकातोंडातून जोरजोरात घोरत आहे

मिशांना उडवणारा

हा कोण आहे आणि इथे काय करत आहे!

वर्षांआधीची गोष्ट आहे ही

ज्याला खूप आवडत असे मी

त्यानेही ऐके दिवशी वैतागून घोषणा केली

कि येणा-या दिवसांतील

एक आंधळी प्रतीक्षा आहे मी.

आणि ही तर त्याही अगोदरची गोष्ट आहे.

जेव्हा माझ्या आत्म्याला पंख फुटले होते

तेव्हा कुण्या धूमकेतूवर प्रेम करण्याची

माझी इच्छा जागली होती.

पण माझ्यावर प्रेम करु इच्छित होतं

वाडीचं मंदिर

किंवा एखादा शासकीय आदेश

किंवा सजवलेली एखादी दिशादर्शक पाटी

किंवा पंक्चर काढण्याच्या दुकानाबाहेर पडलेले

एखादे उदास, फेकलेले टायर.

ज्या दिवसांत सगळी वचने भंग पावत होती

सगळे करार तोडले जात होते

आणि धैर्यासोबत स्वप्न पुरून

रस्ते तयार केले जात होते,

मी एखाद्या जुनाट बदल्याच्या भावनेप्रमाणे

जंगलामध्ये धगधगत होते.

मग वाळलेली पानं पेटली

आणि दीर्घकाळ हा काळ आगीत जळत राहिला.

जळत्या रस्त्यातून मी पुन्हा एकदा

प्रेमाच्या शोधात निघाले

पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता.

तेव्हा स्वप्नांचे अर्थ सांगणारे लोक

सडकेवर तंबू ठोकत होते.

तत्त्वज्ञ जुगाराचे पत्ते वाटत होते

वैज्ञानिक फक्त अनिश्चिततेविषयी

अंदाज लावत होते

आणि महासंहाराबद्दल विज्ञान काल्पनिका लिहित होते.

मार्क्सवादी पंचांग वाचत होते

आणि कवी उत्तर सत्याचं आख्यान रचत होते

किंवा देवकन्येविषयी अलौकिक वासनेच्या कविता लिहित होते

आणि विचार करत होते की

अमर प्रेमी तरी जिंकू शकले काय

हाडामासाच्या एका जिवंत स्त्रीचं हृदय?

जर कुठे थोडसं  प्रेम

शिल्लक होतं

तर ते खूप सामान्य

ओळख नसलेल्या चेह-यांच्या

अतिसामान्य लोकांजवळ.

पण त्याचा शोध घेणंही

तेवढं सोपं नव्हतं

(kavita krishnapallavi)


No comments:

Post a Comment